अशोक सराफ हे एक लोकप्रिय मराठी अभिनेते आहेत. मराठी चित्रपटांसोबत त्यांनी अनेक हिंदी चित्रपटांतही विविध भूमिका केल्या असून दूरचित्रवाणीच्या छोट्या पडद्यावरील हम पांच सारख्या मालिकेमध्येही त्यांनी अभिनय केला. लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत मराठी चित्रपटसृष्टीतील विनोदी चित्रपटांचा काळ गाजवणारे अशोक सराफ हे एक मराठी सुपरस्टार आहेत. सिने अभिनेत्री निवेदिता जोशी ह्या सराफांच्या पत्नी असून नाट्यअभिनेते रघुवीर नेवरेकर हे त्यांचे मामा होते.